Students bags burden (PC - Wikimedia Commons)

शिक्षण विभागाने (Education Department) विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे (Bags Burden) हा पालकांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. परंतु, आता शिक्षण विभागाने यावर नवीन तोडगा काढला आहे. आता पहिली ते 7 वी इयत्तेपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. तसेच 3 महिन्यामध्ये शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम 1 किंवा 2 पुस्तकांमध्ये तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांमधील पुस्तकांची संख्या कमी होणार आहे. परिणामी दप्तरांचे ओझेही कमी होण्यास मदत होणार आहे.

शिक्षण विभाग प्राथमिक पातळीवर राज्यातील काही जिल्ह्यामध्ये हा प्रयोग राबवणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरातील शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व विषयांचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात येणार असल्याची चर्चा झाली. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त प्रकाशित केले आहे. (हेही वाचा - मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल)

सध्या प्रत्येक विषयांची 3 स्वतंत्र पुस्तके आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या तिन्ही विषयाची पुस्तके शाळेत घेऊन जावी लागतात. परंतु, आता शिक्षण विभागाच्या नवीन प्रयोगानुसार, 3 ते 4 विषयांचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील शाळेमध्ये असा प्रयोग सुरू करण्यात येणार असल्याचही बोललं जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर शाळांमध्येही राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.