Coronavirus: बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
Deputy CM Ajit Pawar (PC - Twitter)

Coronavirus: बारामती शहरासह (Baramati City) तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी’ सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा -Maratha Reservation: राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा; विनायक मेटे यांची मागणी)

यावेळी अजित पवार म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, असंही पवार यांनी सांगितलं. याशिवाय मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करावे, असं आवाहनदेखील अजित पवार यांनी यावेळी केलं.