Flood | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा इशारा ओलांडला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. दुसरीकडे वारणा नदीच्या पातळीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशात जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर वारणा नदीत एका झाडावर अडकलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी सकाळी बाहेर काढण्यात आले. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने तब्बल 12 तासांहून अधिक वेळ ही व्यक्ती झाडावरच होती.

कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (KDRF) च्या जवानांनी त्या व्यक्तीची सुटका केल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे पंचगंगा, वारणासह अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

माहितीनुसार, सांगलीच्या शिराळा येथील लाखेवाडी गावात राहणारी बजरंग खामकर नावाची व्यक्ती गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुलावरून वारणा नदीची पाणीपातळी पाहण्यासाठी गेली होती,  मात्र तोल गेल्याने ते पाण्यात पडले. त्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ते पुढे वाहून गेले. आज सकाळी, काही लोकांनी त्यांना नदीच्या मध्यभागी एका झाडावर अडकलेले पाहिले आणि स्थानिक प्रशासनाला सावध केले. त्यानंतर केडीआरएफने ताबडतोब त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक पथक रवाना केले.

सकाळी 10.30 च्या सुमारास, टीम कमांडर कृष्णा सोरटे, सुनील कांबळे, शुभम काटकर, जीवन कुबडे, श्रवण आणि सोमनाथ सुतार यांच्या पथकाने रेस्क्यू बोट वापरून खामकर यांची झाडावरून सुटका केली व त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदतही दिली. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी याबाबत माहिती दिली. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या इसमाने वारणा नदीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती होती. परंतु तोल गेल्याने पाण्यात पडल्याचे खामकर यांनी बाहेर आल्यानंतर सांगितले. (हेही वाचा: CM Eknath Shinde: राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल, मदतीची रक्कमही दुप्पट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

दरम्यान, पंचगंगेच्या पाण्यात वाढ झाल्याने नदीच्या काठावर वसलेल्या सहा गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी 40.66 फूट नोंदवण्यात आली, अशी माहिती जिल्हा आपत्ती कक्षाने दिली. आता आधीच धोक्याची पातळी ओलांडून वाहत असलेल्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 41.2 फुटांवर गेली आहे. नदीचे धोक्याचे चिन्ह 39 फूट तर अतिधोक्याचे चिन्ह 43 फूट आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी शहराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, बुधवारी राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर पंचगंगा नदीची पाणीपातळी 5 ते 6 फुटांनी वाढण्याचा अंदाज होता, मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. हवामान खात्याने शुक्रवारी जिल्ह्यासाठी कोणताही ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला नसल्याने आणि कर्नाटकच्या अलमट्टी धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने एकूण परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.