अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 3 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातला (Maharashtra And Gujarat) वादळाचा (Storm) धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात सध्या दोन वादळांची निर्मिती झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
यातील एक वादळ आफ्रिकेच्या तटावरुन ओमानमार्गे पुढे येमेनच्या दिशेने सरकणार आहे. तर दुसरे वादळ भारताच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा तडाखा महाराष्ट्र आणि गुजरातला बसण्याची शक्यता आहे. सोमवारी या वादळाविषयी आणखी अचूक अंदाज वर्तवला जाईल, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. (वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 2487 नवे कोरोना रुग्ण, तर 89 जणांचा मृत्यू; राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67655 वर पोहोचली)
यापूर्वी अम्फान या महाचक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला होता. अरबी समुद्रामध्ये पुढील 48 तासांमध्ये कमी दाबाच्या पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्राच्या आग्नेय-पूर्व-मध्य-प्रदेशात येत्या 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. हे वारे वायव्य दिशेकडे वाटचाल करीत असून बुधवारी गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळणार आहे.
दरम्यान, अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. अम्फानच्या तडाख्यामुळे 80 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.