मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नवीन संकुलासाठी मुंबईतील वांद्रे येथे राज्य सरकार लवकरच जमीन देईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी (5 नोव्हेंबर) मुंबई येथे दिले. भारताचे सरन्यायाधीश (CJI) यूयू ललित (U U Lalit ) यांचा सत्कार राजभवन (Raj Bhavan) येथे पार पडला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीस बोलत होते. यूयू ललित हे येत्या 8 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. भारताचे मुख्य न्यायमूर्ती यू यू ललीत यांच्या राजभवन येथे पार पडलेल्या सत्कार समारंभास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता हे देखील उपस्थित होते
एकनाथ शिंदे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, आमचे सरकार न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा विचार करत आहे. न्यायव्यवस्थेच्या भल्यासाठी आम्ही काही निर्णय घेत आहोत. नवीन उच्च न्यायालयाच्या संकुलासाठी वांद्रे येथील जागा लवकरच दिली जाणार आहे. ही राज्याची गरज आहे, असे शिंदे म्हणाले. (हेही वाचा, नक्षलवाद्यांकडून मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या OCD ना जीवे मारण्याची धमकी)
एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवीन उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी जमीन वाटप हा मुद्दा प्रदीर्घ काळ प्रलंबीत होता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांच्यासमोर तो प्रदीर्घ काळ चिंतेचा विषय होता. पण आता तो लवकरच सोडवला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनीही दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, आमच्या सरकारने न्यायालयाच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी भूखंड देण्याबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांची प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली चिंता जवळपास दूर झाली आहे. नवीन कॉम्प्लेक्ससाठी वांद्रे, मुंबई येथील जमिनीशी संबंधित सर्व कायदेशीर समस्यांचे निकारकरण झाले आहे. लवकरच जमिनीचे वाटप केले जाईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. दक्षिण मुंबईतील सध्याची उच्च न्यायालयाची इमारत खूप जुनी असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी न्या. यू यू ललीत यांचा उल्लेख महाराष्ट्राचा मुलगा असा केला. यावर आपल्या भाषणात बोलताना न्या. ललीत म्हणाले, मला महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याचा अभिमान आहे.