कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्य सरकार समांतर चौकशी करणार, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांची माहिती
Nawab Malik (Photo Credits: ANI)

कोरेगाव-भीमा प्रकरणी (Bhima Koregaon Case) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी दर्शवत आपल्या पक्षाची बैठक बोलावली होती. राष्ट्रवादी पक्षाच्या या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्य सरकार समांतर चौकशी करणार, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच कोरेगाव-भीमाप्रकरणी अनिल देशमुख कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एसआयटीची स्थापना करतील, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाव सेंटरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह चर्चा केली. या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी नेते, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह 16 जणांनी उपस्थित होते. राष्ट्रवादीची बैठक पार पडल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान नवाब मलिक म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही. भाजपला सरकारमध्ये राहण्याचा रोग झाला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच एनपीआरबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. याशिवाय एनपीआरबाबत तिन्ही पक्षात चर्चा होणार, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय कोकण दौर्‍यावर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील विकासकामांचा घेणार आढावा

कोरेगाव-भीमा प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आल्यापासून शरद पवार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. कोरेगाव-भीमाप्रकरणाची चौकसी महाराष्ट्र पोलीस करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण एनआयएकडे सोपवले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वाद सुरु झाला, असेही सांगण्यात येत होते. परंतु, ही केवळ विरोधीपक्षाची चाल आहे, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.