प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

राज्यात जुलै ते ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे तर पुरात अनके पिके वाहून गेली. मागच्यावर्षी विदर्भातही (Vidarbh) मोठा पाऊस झाला. आता महाराष्ट्र सरकारकडून विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख 27 हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याबाबत माहिती दिली.

ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतले नाही, मात्र अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे अशा  शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1 हेक्टरच्या मर्यादेत (संबंधित शेतकऱ्याकडे 1 हेक्टरपेक्षा जास्त कितीही शेती असली तरी) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF)/राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) नुसार, त्या त्या पिकासाठी/क्षेत्रासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने आज जीआर काढला आहे. (हेही वाचा: पीक नुकसान भरपाईचा पहिला हप्ता देण्यासाठी 2 हजार 59 कोटींचा निधी वितरित; शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार रक्कम जमा)

जिल्हानिहाय मदत -

> नागपूर जिल्ह्यासाठी- 9 कोटी 21 लाख दोन हजार रूपये

> वर्धा जिल्ह्यासाठी 36 लाख 71 हजार रूपये

> भंडारा जिल्ह्यासाठी 8 कोटी 36 लाख 54 हजार रूपये,

> चंद्रपूर जिल्ह्यासाठी 20 कोटी 81 लाख 69 हजार रूपये

> गडचिरोली जिल्ह्यासाठी 30 कोटी 18 लाख 32 हजार रूपये

यात कोरडवाहू पिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) नुसार एकूण 20 हजार 400 रूपये प्रति. हेक्टर, आश्वासित सिंचनाखालील पिकांना 40 हजार 500 रूपये प्रती. हेक्टर तर बहुवार्षिक पिकांना 54 हजार रूपये प्रती. हेक्टर अशी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.