MSRTC Strike: शरद पवार यांच्यासोबत अनिल परब यांची चार तास बैठक, एसटी विलीनीकरण मुद्द्यावरही चर्चा
Anil Parab and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anir Parab) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात आज (22 नोव्हेंबर) एक बैठक पार पडली. ही बैठक तब्बल चार तास चालली. या बैठकीस राज्य परिवहन मंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत एसटी कर्मचारी संप (ST Workers Strike) आणि एसटीचे विलिगीकरण यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ही चर्चा अंतर्गत स्वरुपाची होती. त्यामुळे या चर्चेचा सर्व तपशील बाहेर देता येणार नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यावर संर्वंकश चर्चा या बैठकीत झाल्याचे अनिल परब यांनी सांगितले. शरद पवार यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर अनिल परब हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, सर्वांनाच कल्पना आहे. पाठिमागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपामुळे ग्रामिण भगातील जनता आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. या प्रश्नावर शरद पवार यांनी आज आपणास बोलावले होते. आमच्यात प्रदीर्घ काळ चर्चा झाली. एसचीबाबतचे विविध मुद्दे त्यांनी आमच्याकडून समजून घेतले. आम्हीही त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली. यावर काय तोडगा निघू शकतो. काय काय मार्ग उपलब्ध असू शकतात यावरही आम्ही विचार केला. एसटीचा संप मिटण्यासाठी आणि एसटी रुळावर आणण्यासाठी तसेच, संपकरी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काय करता येऊ शकते, यावर शरद पवार यांनी आमच्यावर सविस्तर चर्चा केली. (हेही वाचा, MSRTC Strike: अनिल परब आणि शरद पवार यांच्या महत्त्वपूर्ण बैठक, एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघण्याची शक्यता)

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली? असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता अनिल परब म्हणाले, ही सर्व चर्चा अंतर्गत स्वरुपाची होती. त्यावर जाहीरपणे भाष्य करता येणार नाही. सर्व गोष्टी योग्य पद्धतीने पार पडल्यावर त्यावर जाहीर भाष्य करण्यात येईल, असेही परब यांनी या वेळी सांगितले. कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेला विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तयार झालेली समिती विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काम करत आहे. आपण सकारात्मक विषयांवर चर्चा करायला पाहिजे, असेरही अनिल परब यांनी सांगितले.