Anil Parab and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांचा संप (MSRTC Strike) अद्यापही कायम आहे. सरकारी पातळीवरुन अनेक प्रयत्न करुनही संपावर तोडगा निघाला नाही. राज्य सरकारमध्ये विलीन करा अशी मागणी करत एसटी कर्मचारी (ST Workers Strike ) पाठीमागील 20 दिवसांपासून संपावर आहेत. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य आहेत. मात्र, विलिनीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे विलिनीकरण सोडून बोला, अशीच काहीशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याचे दिसते आहे. दरम्यान, राज्य परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. या बैठकीत एसटी संपावर चर्चा झाल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, वरळी येथील नेहरु सेंटर येथे ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत एसटी संपाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, एसटी कर्मचारी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करा या मागणीसाठी अडून राहिले आहेत. विलिनीकरणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी न्यायालाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट केल्या जातील असे अनिल परब यांनी म्हटले आहे. तसेच, समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी वाट पाहावी. तोपर्यंत संप मागे घेण्यात यावा, असे अवाहनही परब यांनी केले आहे. मात्र, कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. दिवसेंदिवस हा गुंता अधिकच वाढताना दिसतो आहे. (हेही वाचा, Balasaheb Thorat Statement: राज्य परिवहन आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया)

शरद पावर यांनी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवर आपली भूमिका या आधीच व्यक्त केली आहे. एसटी महामंडळ विलिनीकरणाची मागणी करणे म्हणजे थेट मालक बदलण्याची मागणी केल्यासारखेच आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अनिल परब यांनी या आधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. आता भाजप नेतेही आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत आज काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.