मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते स्वारगेट 'शिवनेरी' बस सेवा लवकरच होणार सुरु
Shivneri Bus Service (Photo Credits: wikimedia commons )

एसटी महामंडळाने सुरु केलेल्या बोरीवली-मुंबई राष्ट्रीय विमानतळ-स्वारगेट या 'शिवनेरी' (Shivneri) बससेवेला नागारिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता एसटी महामंडळाने आता नवीन बस सेवा सुरु केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते स्वारगेट (Swargate) अशी शिवनेरी बससेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे कित्येक प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळ ते स्वारगेट असा प्रवास करणे सोपे जाईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) ते स्वारगेट अशी खासगी टॅक्सी करून जास्त पैसे मोजणा-या प्रवाशांसाठी ही बससेवा खूप फायद्याची ठरणार आहे.

परदेशातून पुण्यात जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध नसल्याने अनेकजण मुंबईत उतरुन मुंबईहून खासगी टॅक्सी करतात. मात्र यासाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. अशा प्रवाशांना एसटी प्रवासासाठी आकर्षित करताना स्वस्त दरात प्रवास घडवण्यासाठी बोरीवली व्हाया मुंबई राष्ट्रीय विमानतळ ते स्वारगेट अशी वातानुकूलित शिवनेरी बस सेवा 16 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 525 रुपये तिकीट दर असलेल्या शिवनेरीच्या दिवसाला 18 फेऱ्या होतात. मुंबई-पुणे महामार्गावर 8 नव्या शिवनेरी बसची सोय

राष्ट्रीय विमानतळावरून असलेल्या शिवनेरी सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरूनही अशाच प्रकारची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या राष्ट्रीय विमानतळमार्गे जाणारी सेवा ही बोरीवली, सायन अशी आहे. बोरीवली, पवईमार्गे जाणारी शिवनेरी सेवाही असून त्याला कमी प्रतिसाद आहे. ही सेवा आंतरराष्ट्रीय विमानतळमार्गे स्वारगेटसाठी चालवली जाईल, असे सांगण्यात येत आहे.