ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं असताना नोकरदार वर्गाला आपल्या पगारात घरं कसे चालवायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी लोकांना पगारवाढीची अपेक्षा असते. मात्र येथे एसटी (ST)  महामंडळाने धक्कादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील एसटीच्या विविध आगारांचे उत्पन्न घटल्याने येथे काम करणा-या कर्मचा-यांचा वेतनात 10 ते 40 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयाने एसटी कर्मचा-यांच्या पायाखालची जमिनीच सरकली आहे.

एसटी महामंडळाला उत्पन्न नसल्याने आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागत आहे. इतकचं नव्हे तर डिझेल खरेदीसाठी काही आगारांकडे पैसे सुद्धा नाहीत. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी एसटी कर्मचा-यांच्या वेतनातून कपात केली जात आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, परिणामी एसटी कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

हेदेखील वाचा- 'Paytm' वर मिळणार एसटीचे तिकिट, या एसटी बसेस चे होणार ऑनलाईन बुकिंग

ठाण्यातील कर्मचा-यांच्या वेतनात 40%, साता-यात 20%, सिंधुदुर्गात 30%, अकोल्यात 70% आणि रत्नागिरीत 19% कपात करण्यात आली आहे. महामंडळाच्या या अजब निर्णयाने संतापलेल्या कर्मचा-यांनी 100% वेतन न दिल्यास आंदोलन छेडण्याची भूमिका मांडली आहे.

जनता महागाईने होरपळलेली असताना एसटी महामंडळाचा हा निर्णय म्हणजे एसटी कर्मचा-यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ करणारा आहे. यावर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढावा आणि हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी कर्मचा-यांकडून केली जात आहे.

अलीकडेच पेटीएमने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी (ST) भागीदारी केल्याने आता एसटी प्रवाशांना सणांच्या हंगामात याचा खूप फायदा होणार आहे. भारतातील मोबाईल वॉलेट अॅप पेटीएमने एसटीशी भागीदारी केली असून आता एसटी प्रवाशांना ऑनलाईन तिकिट बुकिंग करता येणार आहे. यात शिवशाही, एसी-शिवनेरी, नाइट एक्सप्रेस, ऑर्डिनरी एक्सप्रेस, डे ऑर्डिनरी, शिवशाही स्लिपर, सेमी लक्झरी आदि बसचे तिकिट बुकिंग करता येईल. ही तिकिटे तुम्ही पेटीएम अॅप किंवा वेबसाइटवरुनही आरक्षित करु शकतात.