ST bus | (Photo Credit: MSRTC)

एसटी महामंडळाने (MSRTC) आपल्या प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध केली आहे. रेल्वेच्या ‘रेल नीर’ (Rail Neer) या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडप्रमाणेच आता एसटी महामंडळाचे ‘नाथ-जल’ (Nath Jal) लवकरच प्रवाशांना मिळणार आहे. वारकरी संप्रदायाचा आदर डोळ्यासमोर ठेवून एसटी महामंडळाने 'नाथ जल' असे नामकरण केले आहे. या सेवेचा लाभ राज्यातील सर्व प्रवाशांना घेता येणार आहे. ही सुविधा खासगी यंत्रणेमार्फत पुरविली जाणार आहे. ही प्रक्रिया राबवण्यासाठी एसटी महामंडळाने काम सुरू केले आहे. (हेही वाचा - IRCTC ने लागू केला नवीन नियम, ट्रेन चुकल्यावर कोणत्याही शुल्काशिवाय मिळणार सर्व पैसे परत; घ्या जाणून)

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांची आर्थिक लुट थांबावी आणि प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ‘रेल नीर’ या नावाने बाटलीबंद पाणी मिळण्याची सुविधा सुरू केली होती. ही सुविधा प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून दिली जात होती. या सुविधेला रेल्वे प्रवाशी चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे एसटी महामंडळानेदेखील आपल्या प्रवाशांसाठी नाथ-जल उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. या योजनेला 'नाथ जल' असे नाव देण्यामागे वारकरी संप्रदयाचा मान ठेवण्यात आला आहे. संत एकनाथ यांच्या नावातील 'नाथ' या शब्दावरून या उपक्रमाला ‘नाथ जल’असे नाव देण्यात आले आहे.

वाचा - सणासुदीच्या काळात ख्रिसमसपर्यंत धावणार 200 जादा गाड्या; पहिल्यांदा उपलब्ध होणार 'या' सुविधा- रेल्वेचा निर्णय

अनेकदा बस स्थानकावर जास्त दराने पाण्याच्या बॉटल विकल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लुट होते. तसेच अनेकदा हे पाणी स्वच्छचं असते, याचीदेखील शास्वती नसते. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि कमी दरात पाणी मिळावे, या हेतूने एसटी महामंडळाने ‘नाथ जल’ हा उपक्रम सुरू केला आहे.