
कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा 23 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण देण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थांना एकतर्फीच शिक्षण मिळाले आहे. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे आणि पुढील दिशा ठरवणारे असते. दरम्यान, कोरोनाचे संकट टळलेले नसून यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनादेखील पडला आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता यावर्षी बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये तर, दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर राज्य सरकार विचार करत आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत.
"सर्वसाधारणपणे बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर, दहावीच्या परीक्षा मार्चमध्ये असतात. परंतु, कोरोनामुळे राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील शाळा पूर्णपणे सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरील विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर आणणे आणि 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यावर विचार सुरु आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा हाच यामागचा उद्देश आहे. त्यामुळेच आपण बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत आहोत" असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- MHT CET PCM & PCB Results 2020: पीसीएम आणि पीसीबी सीईटी परीक्षांचे निकाल आज होणार जाहीर, कसा पाहाल निकाल
याआधी राज्यातील दहावी आणि बारावीच्या एटीकेटी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती.
कोरोनाच्या संकट काळात जालना जिल्ह्यातील शाळा संस्था तसेच तेथील शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक असे सगळेच आपापल्या पातळीवर सुरक्षेची काटेकोरपणे काळजी घेत आहेत. परंतु खबरदारीचा भाग म्हणून विशेष अधिकारी पथक शाळांच्या भेटी घेत आहे.