कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांचा मनात संभ्रम होता. मात्र आता हा संभ्रम दूर झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
याआधी राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागासाठी एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या एसएससी आणि एचएससीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Maharashtra SSC, HSC Board Exam 2021: दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर, विद्यार्थ्यांना mahahsscboard.in वर मिळणार अधिक माहिती
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी 'या' महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
- दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
- लेखी परीक्षा ही विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच होणार
- वर्गखोल्या कमी पडल्या बाजूच्या शाळेत बैठक व्यवस्था केली जाणार
- यंदा 80 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ
- 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार
- दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं
- प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने
10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या सत्रात पार पडतील.
कोरोनामुळे हे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाईल. जर वर्ग कमी असल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.