Maharashtra SSC, HSC Board Exam 2021: राज्यात कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुले अद्याप शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे सुरु करण्यात आलेली नाहीत. तसेच अजून सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. अशातच आता राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे आणि बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान घेतली जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
याआधी राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकोण या विभागासाठी एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या एसससी आणि एचएससीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना सोशल मीडियात बोर्ड परीक्षेसंदर्भात व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संकेतस्थळावर अधिकृत पद्धतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी तेथे ते पहावे. तसेच परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमििक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून छापील स्वरुपातील वेळापत्रक सुद्धा जाहीर केले जाणार आहे.