Anil Deshmukh | (Photo Credit- Credit -ANI / Twitter)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीद्वारा करण्यात आलेली मागणी फेटाळून लावत मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने (Special PMLA Court) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल देशमुख यांना आता 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहावे लागेल. न्यायालयात सुनावणी सुरु होती तेव्हा पत्रकारांना न्यायालयात प्रवेश नव्हता. सुनावणी सुरु असताना पत्रकारांना मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबण्याचे आदेश होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बेनामी संपत्ती (money laundering) जमविल्याचा आरोप आहे. या आरोपावरुन ईडीने अनिल देशमुख यांची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणातच अनिल देशमुख यांना अटक झाली असून, सध्या ते ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. (हेही वाचा, Parambir Singh On Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांविरोधात कोणतेही पुरावे नाही - परमबीर सिंग)

सुनावणी दरम्यान ईडीने अनिल देशमुख यांच्या 9 दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली. ईडीच्या मागणीवर न्यायालयात अनिल देशमुख आणि ईडी अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आपला निर्णय दिला.

ट्विट

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे याने 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात आणि पोलिस दलातही मोठीच खळबळ उडाली. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. केंद्रीय यंत्रणा ईडी आणि इतर संस्थांकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.