रमेश सोलंकी (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने (Shiv Sena) राष्ट्रवादी व कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याने काही शिवसैनिक नाराज असलेले दिसत आहे. मंगळवारी शिवसैनिक रमेश सोलंकी (Ramesh Solanki) यांनी शिवसेनेच्या युवा सेना युनिटमधून राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या युतीबद्दल आपला संताप व्यक्त करत, त्यांनी सलग अनेक ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये आपण राजीनामा देत असल्याचा उल्लेख ते करतात. यावरून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापनेचे उचललेल पाऊल किती भारी पडणार आहे हे समजण्यास सुरुवात झाली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये रमेश सोलंकी म्हणतात, ‘मी बीव्हीएस/युवासेना पदाचा राजीनामा देत आहे. मला मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानमधील लोकांची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानतो.’ पुढे ते म्हणतात, ‘जेव्हा जहाज बुडत असते तेव्हा प्रथम उंदरे उडी मारतात, मात्र आज जेव्हा शिवसेनचे स्थान पक्के झाले आहे, जेव्ह शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे तेव्हा आपल्या आदर्शांसाठी मी शिवसेनेतून बाहेर पडत आहे.’ (हेही वाचा: उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीकडून अधिकृत घोषणा; 'या' दिवशी शिवतीर्थावर पार पडणार ग्रँड शपथविधी सोहळा)

शेवटी ते म्हणतात, ‘माझी जाणीव व विचारसरणी मला कॉंग्रेसबरोबर काम करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. राजीनामा दिल्यानंतरही सर्व शिवसैनिक नेहमीच माझे भाऊ व बहिणी असतील, 21 वर्षाच्या काळात आमचे हे विशेष बंध तयार झाले आहेत. मी मनापासून नेहमीच बाळासाहेबांचा पक्का शिवसैनिक राहीनं. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनचे अभिनंदन.’