महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून तेथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे काही जिल्ह्यांत विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown), कडक नियम आणि पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) ठेवण्यात आला आहे. अशीच काहीशी परिस्थिती सोलापूर शहरात उद्भवल्यामुळे या जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे आठवड्यातील शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 35,952 रुग्णांची व 111 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 20,444 रुग्ण बरे झाले आहेत.यासह एकूण प्रकरणांची संख्या 26,00,833 वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत 22,83,037 रुग्ण बरे झाले आहेत व 53,795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 2,62,685 सक्रीय रुग्णावर उपचार सुरु आहेत.हेदेखील वाचा- Coronavirus In Nagpur : नागपूर शहरात दिवसभरात 3,579 जणांना कोरोना संक्रमण, 47 जणांचा मृत्यू
शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा असणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि जनावर बाजार देखील बंद राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील. सर्व धार्मिक विधीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेत आहेत.
त्याचबरोबर रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सोलापुरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान नागपूर शहरात दिवसभरात 3,579 जणांना कोरोना संक्रमण, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेऊन काल दिवसभरात 2,285 जण बरेही झालेआहेत. तर पुणे शहरात गेल्या 24 तासात 6,432 जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. 2,808 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.