Ranjitsinh Disale (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद अशी एक गोष्ट घडली आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक क्षेत्रात अटकेपार झेंडा रोवला आहे. आताही असेच काहीसे घडले आहे. यंदाचा ग्लोबल टिचर पुरस्कार (Global Teacher Award) सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना मिळाला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार तब्बल 7 कोटींचा आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी गौरवाची बाब आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजाराहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता निवडण्यात आला आहे. यात अंतिम फेरीत 9 शिक्षक निवडण्यात आले होते. त्यात रणजितसिंह डिसले यांच्या नावाच्या घोषणा करण्यात आली.

पाहा तो अविस्मरणीय क्षण

आपल्या नावाची घोषणा होताच रणजितसिंह डिसले आणि त्यांच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रणजितसिंह डिसले यांनी आपल्याला मिळालेल्या बक्षिसाच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे ठरवले आहे. यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. त्याच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.