Solapur Shocker: अमावस्या असल्याने घरमालकाने भाडेकरूचा मृतदेह आणण्यास केला मज्जाव; वृद्ध आई आणि दिव्यांग भावाला ऐन पावसात काढावी लागली रात्र!
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

सोलापूर (Solapur) मध्ये माणूसकीला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. गोदूताई परूळेकर घरकूल वसाहती मध्ये आजारपणामुळे रात्री निधन झालेल्या भाडेकरूचा मृतदेह केवळ अमावस्या असल्याने घरी आणण्यास घरमालकाने मज्जाव केल्याचा हा प्रकार आहे. यामुळे मृतदेह घेऊन रात्र पावसात काढण्याची वेळ मृताच्या कुटुंबियांवर आली होती. पुरोगामी विचार असलेल्या महाराष्ट्रामध्ये आजही अंधश्रद्धांचा पगडा समाजाच्या काही भागात अगदी घट्ट असल्याचं आजही बघायला मिळत आहे.

मृत व्यक्तीचं नाव शंकर यल्लप्पा मुटकिरी असं आहे. 49 वर्षीय शंकर शिंपीकाम करत होते. त्यांना पक्षघाताचा झटका आला. त्यांनंतर हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयातून त्यांचा मृतदेह गोदूताई परूळेकर विडी घरकूल वसाहतीत आणताना मात्र घरमालकाने सोमवती अमावस्या असल्यामुळे मृतदेह घरी आणण्यास आडकाठी केली. शंकर यांची आई वयोवृद्ध आहे तर भाऊ हा दिव्यांग आहे. त्यांच्या नातेवाईकांनीही अमावस्या असल्याने शंकरच्या अंत्यविधीला नकार दिला. पावसातून आई आणि भावाने मृतदेह आणला पण तो घरात नेऊ न शकल्याने त्यांना रात्र पावसातच मृतदेहासोबत काढावी लागली. या घटनेची माहिती मिळताच गोदूताई परूळेकर विडी घरकूल परिसरातील माकपचे कार्यकर्ते वसीम मुल्ला, विल्यम ससणे व इतर कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मृतदेहाचा अंत्यविधी आटोपण्यास मदत केली. Madhya Pradesh: अंधश्रद्धेचा कळस! नवस फेडण्यासाठी 25 वर्षीय महिलेने देवीसमोर कापली आपली जीभ; नातेवाईकांचा रुग्णालयात नेण्यास नकार .

गरीब महिला विडी कामगारांसाठी गोदूताई परूळेकर यांच्या स्मरणार्थ पथदर्शी घरकूल प्रकल्प उभारला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतः येऊन या घरकूल प्रकल्पाच्या किल्ल्या लाभार्थी महिला विडी कामगारांना दिल्या होत्या. पण या गरीब विडी कामगारांच्या घरकूल वसाहतीत दारू, जुगार, सावकारी सारखे अवैध प्रकार सुरू आहेत. गुंडगिरी देखील वाढल्याचे समोर आले आहे.