जन्मदात्या बापानेच आपल्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यात घडली आहे. काहीही काम धंदा न करता घरात सर्वांना त्रास देणे, जमीन नावावर करुन दे म्हणत तगादा लावणे अशा प्रकारच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या वळसंग (Walsang) परिसरात ही घटना घडली आहे. वडीलांना मुलाचा काटा काडण्यासाठी तीन मारेकऱ्यांना सुमारे 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला मुलाच्या वडीलांसह इतर तीन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सुरेश सिध्दलिंग घोंगडे (वय ६२, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) असे वडिलांचे तर, शैलेश सुरेश घोंगडे (वय 31) असे मुलाचे नाव आहे. सुरेश घोंगडे याने संजय ऊर्फ भोजू राठोड (वय २८, मूळ रा. मुळेगाव तांडा, दक्षिण सोलापूर सध्या रा. आशाननगर, सोलापूर), शंकर नारायण वडजे (वय ४७, रा. सेवालालनगर तांडा, ता. उत्तर सोलापूर) व राहुल चंदू राठोड (वय २८, रा. मुळेगाव तांडा) या तिघांना मुलगा शैलेश सुरेश घोंगडे याची हत्या करण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या सर्वांना अटक केली असून, सध्या त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. (हेही वाचा, अहमदनगर: प्रेयसीसोबतचे Sex Videos मोबाईलमधले पाहिले म्हणून नवऱ्याने बाकोला जिवंत जाळले)
सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) गावच्या शिवारात २९ जानेवारी रोजी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. साधारण 35 वर्षे वयाच्या तरुणाचा हा देह असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा या तरुणाचा मृत्यू दोरीने गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी वळसंग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तसेच, केलेल्या तपासात हा मृतदेह शैलेश सुरेश घोंगडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) याचा असल्याचे समोर आले.
दरम्यान, वळसंग पोलीसांनी अधिक तपास केला असता या तरुणाची हत्या त्याच्या वडीलांनीच केल्याचे समोर आले. तसेच, ही हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचेही तपासात पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी मृताचे वडील सुरेश घोंगडे व खुनाची सुपारी घेतलेला शंकर वडजे आणि इतरांना ताब्यात घेतले. आरोपींनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.