गेल्या काही दिवसांपासून सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यात एका नरभक्षक बिबट्याने (Man Eating Leopard) दहशत माजवली होती. तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह आणि सोमवारी शेटफळ चिखलठाण परिसरात हा बिबट्या दिसून आला होता. या बिबट्याने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता हा बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळने याबाबत वृत्त दिले आहे. याआधी बिबट्याला जेरेबंद करण्यासाठी शार्प शूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासह पाच गन मॅन प्रयत्न करत होते. आज शार्प शूटरने गोळी घालून या बिबट्याला ठार मारण्यात आले आहे.
1 डिसेंबरपासून करमाळा परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अहमदनगर, बीड जिल्ह्यातून हा बिबट्या करमाळा येथे आला असल्याचे सांगण्यात आले होते. याआधी त्याने 4 जणांचा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एका उसतोडमुलीवर या बिबट्याने हल्ला केल्याने ऊस फडाशेजारी जाळे लावून वन विभागाचे गन मॅन, शार्प शूटर व पोलीस अधिकारी उसात तपास करीत होते. मात्र त्यावेळी या बिबट्याने सर्वांना चकवा देऊन आपला जीव वाचवला. हा बिबट्या अंदाजे साडे चार वर्षे वयाचा असावा असा अंदाज डॉ. मंडलिक यांनी व्यक्त केला होता.
या बिबट्याने 3 डिसेंबर, 5 डिसेंबर व 7 डिसेंबर अशा दोन दिवसांच्या अंतराने तीन जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी गाई व वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. अशा प्रकारे या बिबट्याचे भीतीने लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत होते. या परिसरात अनेक मजूर व शेतकरी यांचे वास्तव्य असल्याने बिबट्याच्या दहशतीने त्यांना कामावर जाणेही शक्य नव्हते. बिबट्याची दहशत पाहून जामखेडाचे आमदार रोहित पवार यांनीही या परिसराला भेट देऊन, कोणत्याही परिस्थितीमध्ये बिबट्याला जेरेबंद करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. (हेही वाचा: सोलापूर: करमाळ्यातील बिटरगावात नरभक्षक बिबट्या ट्रॅप चुकवत पुन्हा पसार; ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण)
बिबट्याला मारण्यासाठी गेले काही दिवस वनविभाग शार्प शूटर, ड्रोन कॅमेरे, डॉग स्क्वाड यांच्यासह प्रयत्न करत होते व आज त्यांना यश आले.