करमाळ्याच्या बिटरगाव भागामध्ये नरभक्षक बिबट्याचा थरार अजूनही कायम आहे. मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या या भागात वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. शेतात काम करताना महिलेच्या नजरेस बिबट्या पडल्यानंतर तिच्यासह काही मजुरांनी बिबट्याला पाहून दगड भिरकावला. यामध्ये तो बिथरून पळाला मात्र अद्याप वनविभागाच्या हाती लागला नसल्याने त्याची दहशत कायम अअहे. वनविभागाने त्याचा शोध घेत 3 राऊंड फायर आणि ट्रॅप लावूनही त्यामधून पळ काढला आहे.
दरम्यान 1 डिसेंबरपासून हा बिबट्या मोकाट फिरत आहे. करमाळा तालुक्यात लिंबेवाडी, अंजनडोह, शेटफळ, चिखणठाण परिसरात तो फिरत आहे. मागील काही दिवसांत त्याने 3 जणांचा बळी घेतला आहे. यानंतर वन विभाग त्याचा शोध घेत आहे. शार्प शूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासोबत 5 गनमॅन ट्रॅप लावून बिबट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान एबीपी मराठीच्या वृत्तानुसार, मंडलिक यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा बिबट्या जनावरांवर हल्ला करत नाही मात्र माणसांवर हल्ला करतो. त्याचे वय अंदाजे साडेचार वर्ष असू शकतं. तर संध्याकाळी 5-7 आणि सकाळी 10-12 या काळामध्ये लोकांनी विशेष सावध रहाणं गरजेचे आहे. ही त्याची हल्ला करण्याची वेळ असू शकते.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी करमाळा येथील वांगी सांगवी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, पोलिस तैनात आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला आहे. मुंबई: आरे मिल्क कॉलनीमध्ये म्हशीच्या गोठ्यात शिरला वाट चुकलेलं बिबट्याचा बछडा; स्थानिकांनी वनात पुन्हा जायला केली मदत!
मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुणे शहरात मुख्य रस्त्यावर काही दिवासांपूर्वी रानगवा आल्याचंही पहायला मिळालं होतं. त्यावेळेस गव्याला पकडताना माणसांनी केलेल्या गोंधळामुळे तो बिथरला आणि वन विभागाच्या हाती आला मात्र थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.