सोलापूरच्या बिल्डरची झटपट पैसे कमावण्याच्या नादात 2 कोटींची फसवणूक; 6 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात
आर्थिक घोटाळा । PC: (Photo Credits: IANS |Representational Image)

महाराष्ट्रात सोलापूर (Solapur) मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 2 कोटींची फसवणूक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार या फसवणूकीच्या गुन्ह्यात सुमारे 6 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका कंपनीच्या फायद्याचं आमिष दाखवत या 6 जणांच्या टोळीने सोलापूरच्या व्यावसायिकाची फसवणूक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचा यापूर्वीच कोविड 19 संकटामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे तो देखील झटपट नफा मिळवण्याच्या शोधात होता. दक्षिण मुंबई तील झवेरी बाजार मधील काही ट्रेडर्सच्या संपर्कामध्ये तो आला होता. त्यांना त्याला अहमदाबादच्या Avaada Power Company मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल असे सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका व्यक्तीने तो कंपनीचा वरिष्ठ कर्मचारी असलयाचं भासवलं होतं. त्याने 2 करोड घेऊन ते आपण गुंतवणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र काही दिवसांतच अशा प्रकारची कोणतीही गुंतवणूक झाली नसल्याचं लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं व्यावसायिकाला समजलं. व्यावसायिकाने त्या व्यक्तीला पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो फोन नंबर स्विच ऑफ किंवा ब्लॉक केला असल्याने लागत नव्हता.

व्यावसायिकाने पोलिस तक्रार दाखल करताच गुन्हेगारांचा तपास सुरू झाला. हे फसवणूक करणारे गुजरात मध्ये आढळले. दरम्यान पोलिसांकडून या अरोपींनी अशाप्रकारे इतर कोणाला लुबाडले आहे का? याचा तपास सुरू आहे.