आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) आणि देशाची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता ही वाढती प्रकरणे लक्षात घेता, लोकांनी आपल्या पातळीवर सुरक्षेची व्यवस्था करण्यास सुरवात केली आहे. या शहरांमध्ये राहणा-या लोकांनी इमारतीतच आयसोलेशन केंद्रे (Isolation Facilities) तयार करणे आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरुन संक्रमित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील. मुंबईतील परळ येथील निवासी संकुलात इमारतीतच रूग्णांच्या काळजीसाठी क्वारंटाइन यूनिट (Quarantine unit) आणि आयसीयू (ICU) बेड उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
त्याचवेळी, दिल्लीतील निवासी कल्याण संघटनेने ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर (oxygen concentrators) विकत घेतले आहे. परेलच्या अशोक टॉवर्स (Ashok Towers) मध्ये चार उंच इमारतींचा समावेश आहे, इथे जवळजवळ 650 कुटुंबे राहत आहेत. आता लोकांच्या काळजीसाठी सोसायटीवाले पुढे आले आहेत. रहिवाशांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी, संकुलात रिक्त फ्लॅट्स तसेच क्लब हाऊस आणि पार्टी हॉलचा वापर आयसोलेशन वॉर्ड मध्ये होणार आहे. यासाठी बीएमसीची परवानगीही घेण्यात येणार आहे.
अशोक टॉवर्सच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य डॉ. निलेश शहा म्हणाले, 'आम्ही आमच्या क्लब हाऊस आणि पार्टी हॉलमध्ये आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागा शोधण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री घेण्याच्या प्रक्रियाही सुरु आहे. आमच्या या खासगी उपक्रमामुळे सरकारला मदत तर होईलच, त्यासोबत आम्हीही स्वावलंबी बनू.' यासाठी सोसायटीमधीलच 20 डॉक्टरांची टीम मदत करणार आहे. या सुविधा गंभीर आजारी असलेल्या रूग्णांसाठी नसतील, तर ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत व जी अतिशय सौम्य प्रकरणे आहेत, त्यांच्यावर इथे उपचार होतील. (हेही वाचा: गेल्या 48 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 129 कर्मचाऱ्यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह, संक्रमितांचा आकडा 3 हजारांच्या पार)
आतापर्यंत अशोक टॉवर्समधील चार रहिवाशांना कोविड-19 ची लागण झाली आहे व यापैकी केवळ एकाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे बीएमसीके बेड्सची कमतरता आहे, अशात सोसायटीच्या या उपक्रमामुळे सरकारवरील ताण कमी होऊन लोकांना मदत होणार आहे.