खंडणी वसुलीचे आरोप असलेले व्यावसायिक Jitendra Navlani यांच्यावरील SIT चौकशी बंद; सरकारी वकिलांची कोर्टात माहिती
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खंडणी वसुलीचे आरोप केलेले व्यावसायिक जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani)  यांच्या विरूद्धची एसआयटी चौकशी आता राज्य सरकारने बंद केली आहे. राज्य सरकार कडून तशी माहिती बॉम्बे हाय कोर्टात देण्यात आली आहे. दरम्यान ईडी अधिकार्‍यांसाठी खंडणी वसुलीचा जितेंद्र नवलानींवर आरोप होता. महाविकास आघाडी सरकारने याबाबत एसआयटी चौकशी सुरू केली होती.

जितेंद्र नवलानी ईडी अधिकार्‍यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 2015 ते 2021 दरम्यान त्यांनी 58.96 कोटी खंडणी वसूल केल्याचा राऊतांचा आरोप होता. तसेच नवलानी हे भाजपाच्या किरीट सोमय्या यांचे देखील निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे देखील नक्की वाचा: Jitendra Navlani: जितेंद्र नवलानी यांच्यावर गुन्हा दाखल, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांची एसीबीकडून दखल .

जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी, सरकारी वकील यांच्यामध्ये 5 जुलैला चर्चा त्यावेळी झाली. चौकशी अधिकाऱ्यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. एसआयटीला खंडणी आणि फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळले नसल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या परवानगीने ही एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे.

बुधवारी मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील अरुणा पै यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.