
सायन स्टेशन (Sion Station) बाहेरील ब्रिटीशकालीन रेल्वे पूल धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल IIT Bombay कडून एप्रिल 2020 मध्ये देण्यात आल्यानंतर तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र तिसर्यांदा हा निर्णय घेऊन त्याला स्थगिती देण्यात आली आहे. मागील 3 महिन्यातील ही तिसरी वेळ आहे. आता लोकसभा निवडणूकांनंतर (Lok Sabha Elections) या सायनच्या पूलाचं तोडकाम आणि वाहतूकीसाठी तो बंद केला जाण्याची शक्यता आहे.
112 वर्ष जुना हा पूल सायन-धारावी मार्गे वांद्रे पूर्व भागाला जोडतो. हा पूल तोडून मध्य रेल्वेला त्यांच्या मार्गावर 5व्या आणि 6व्या लाईनचं काम पूर्ण करण्यासाठी हा पूल पाडणं गरजेचे आहे. 1912 पासूनचा, ROB हा धारावी, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता हा बंद केल्यास पूर्व-पश्चिम वाहतूक विस्कळीत होणार आहे. वाहनचालकांना कुर्ल्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. ROB पाडण्याण्यासाठी तीन महिने आणि पुनर्बांधणीसाठी दोन वर्षे लागणार असा अंदाज आहे तर एकूण खर्च अंदाजे ₹50 कोटी आहे.
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे लाईन टाकणे सुलभ करणे हे या पुनर्बांधणीचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या वेगळे करण्यात मदत होईल. अतिरिक्त लाईन्स सामावून घेण्यासाठी ROB मधील गर्डरचा कालावधी सध्याच्या 30 मीटरवरून 49 मीटरपर्यंत वाढवणे आवश्यक आहे.
पहिल्यांदा हा पूल 20 जानेवारीला बंद करून तोडकाम सुरू केले जाणार होते. मात्र स्थानिकांच्या मागणीवरून खासदार राहुल शेवाळे यांनी ते काम थांबवले. नंतर 28 फेब्रुवारीची तारीख ठरली. मात्र पूल बंद झाल्याने ऐनवेळेस 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते या कारणास्तव हे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते. बारावीची परीक्षा 19 मार्च आणि दहावीची परीक्षा 26 मार्चला संपणार आहेत. त्यामुळे आता 28 मार्च पासून सायनचा धारावी मार्गे वांद्रे पूर्व ला जाण्यासाठी रस्ता बंद केला जाणार आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा नवा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे.