ट्राफिक (प्रातिनिधिक फोटो ) Photo Credits PTI

मुंबईत मागील काही महिन्यात अंधेरी फ्लायओव्हर आणि ठाण्याजवळील वाशी टोलनाक्याजवळ ब्रिज कोसळल्याच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने इतर ब्रिजची तपासणी करून त्याच्या दुरूस्तीच्या कामाचा वेग वाढवला आहे. येत्या काही महिन्यामध्ये सायन फ्लायओव्हर ब्रीज डागडुजीच्या कामासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायन फ्लायओव्हर ब्रिज अंशतः किंवा पूर्णपणे वाहतूकीसाठी बंद होणार आहे.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडजवळील ब्रीज बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. सायन फ्लायओव्हर बंद करण्यात आल्याने वाहतुकीसाठी चुनाभट्टी, सायनचा रस्ता वापरावा लागणार आहे.

जून, जुलै महिन्यातच या फ्लायओव्हरचं काम घेण्यात येणार होतं, मात्र पावसाळा आणि या सायन सखल भाग असल्याने पाणी साचण्याचं प्रमाण, त्यामुळे ट्रफिकचा उडणारा बोजवारा पाहता हे काम पुढे ढकलण्यात आलं आहे.

सायन फ्लायओव्हर ब्रीज बंद केल्यानंतर पुढील 3-4 महिने त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येईल. हा कालावधी पोलिस प्रशासन आणि ट्राफिकची स्थिती पाहून ठरवला जाणार आहे. सध्या लोअर परेल स्थानकाबाहेरील ब्रिजदेखील डागडुजीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे.