सुगड पूजन विधी

मुंबई: नवीन वर्षातील पहिला महत्त्वाचा सण मकर संक्रांत यंदा बुधवार, 14 जानेवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशासोबतच महाराष्ट्रातील घराघरात 'सुगड पूजन' करण्याची प्राचीन परंपरा आहे. सुगड म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानले जाणारे मातीचे छोटे घट. हे पूजन केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे. यंदा संक्रांतीचा क्षण दुपारी 3:13 मिनिटांनी येत असला तरी, सुगड पूजन सकाळी करणे अधिक फलदायी मानले जाते.

सुगड पूजनाचे महत्त्व काय?

'सुगड' हा शब्द 'सुघट' या शब्दाचा अपभ्रंश आहे, ज्याचा अर्थ 'सुघटित असा घड' असा होतो. हे घट शेतातील नवीन धान्याने भरले जातात. यामध्ये रब्बी हंगामातील नवीन पिकांचे अंश देवाला अर्पण केले जातात. सुगड पूजन केल्याने घरात वर्षभर अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि सुख-समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.

सुगड पूजेसाठी आवश्यक साहित्य

सुगड पूजनासाठी खालील साहित्याची आवश्यकता असते:

पाच सुगड (दोन मोठे आणि तीन छोटे, प्रामुख्याने काळ्या आणि लाल रंगाचे).

नवीन धान्य: हरभरे, ऊस, शेंगदाणे, बोरं, गव्हाच्या लोंब्या.

गाजर आणि वाटाणा.

हळद-कुंकू आणि अक्षता.

तिळगुळ आणि हलवा.

हळदी-कुंकवाची बोटे लावलेला पांढरा दोरा.

शास्त्रोक्त सुगड पूजा विधी

1. जागा आणि मांडणी: घराच्या देवघरासमोर किंवा पाटावर रांगोळी काढून त्यावर स्वस्तिक काढावे. पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर थोडे तांदूळ किंवा गहू ठेवावेत. 2. सुगडांची तयारी: पाचही सुगडांना उभ्या हळदी-कुंकवाच्या पाच रेषा ओढाव्यात. त्यांच्या गळ्याला हळदी-कुंकवात भिजवलेला दोरा गुंडाळावा. 3. भरणा: प्रत्येक सुगडामध्ये हरभरे, बोरे, उसाचे कांडके, गव्हाच्या लोंब्या, गाजर आणि तिळगुळ भरावे. 4. स्थापना: तांदळाच्या ढिगावर मोठे सुगड खाली आणि त्यावर छोटे सुगड ठेवावेत. 5. पूजन: सुगडांना फुले, अक्षता आणि हळद-कुंकू वाहून धूप-दीप ओवाळावा. तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना करावी.

2026 मधील शुभ मुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार, 14 जानेवारी रोजी पुण्यकाळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत असेल. मात्र, सुगड पूजनासाठी सकाळचा वेळ (सकाळी 7:15 ते दुपारी 12:00) अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सवाष्णी एकमेकींच्या घरी जाऊन सुगडातील वाणाची देवाणघेवाण करतात, ज्याला 'ववसा' असेही म्हणतात.

नूतन विवाहितांसाठी 'ववसा'

ज्या महिलांची लग्नानंतरची ही पहिली संक्रांत आहे, त्यांच्यासाठी सुगड पूजन विशेष महत्त्वाचे असते. त्या माहेरी किंवा सासरी 'ववसा' भरून सुवासिनींना वाण देतात. यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर असल्याचे सांगितले जात असल्याने, वाणात पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करण्याकडे अनेकांचा कल आहे.