Radhe Maa (Photo Credits: Instagram)

सध्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) घोंघावत आहे. या वादळाचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही झाला आहे. चक्रीवादळामुळे विमान कंपन्यांना मुंबई आणि गुजरातमधील अनेक उड्डाणे उशिरा करण्यास किंवा पुढे ढकलण्यास भाग पाडले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईवरून दोहाला जाणाऱ्या विमानाला प्रचंड उशीर झाल्याने प्रवासी विमानतळावर ताटकळत थांबले आहेत. मुंबईहून दोहाला जाणाऱ्या एआय 981 फ्लाइटचे शेकडो प्रवासी जवळपास 24 तास विमानतळावर थांबले आहेत व आता त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे.

हे प्रवासी विमान कंपनीविरुद्ध निदर्शने करत आहेत. अशात दोहाला जाणाऱ्या उशीर झालेल्या या एअर इंडियाच्या विमानातील निराश प्रवाशांना शांत करण्यासाठी स्वयंभू देवी राधे माँ (Radhe Maa) मंगळवारी मुंबई विमानतळावर पोहोचली. विमानतळावर प्रवासी एअर इंडियाविरुद्ध निदर्शने करत असताना अचानक राधे माँ तिच्या कार्यकर्त्यांसह विमानतळावर दिसली. यावेळी तिने विमान कंपनीवर चिडलेल्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रवाशांना एअर इंडियाविरोधातील निदर्शने थांबवण्याचे आवाहन केले.

ती म्हणाली, ‘बिपरजॉय ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि एअरलाइन्स त्याबद्दल काहीही करू शकत नाहीत. जे देवाच्या मनात असते तसेच घडते. तुम्ही लोक घोषणा देऊ नका. ते (एअर इंडियाचे कर्मचारी) देखील माणसेच आहेत, प्रत्येक माणसात देव आहे. जगातील प्रत्येक गोष्ट सर्वशक्तिमानाच्या इच्छेनेच घडते. मानवी नियंत्रणात काहीही नाही. त्यामुळे हाय-हायच्या घोषणा देणे योग्य नाही.’ (हेही वाचा: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून)

परंतु यातील काही प्रवासी स्वयंघोषित देवीचे प्रवचन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रवाशांनी राधे माँकडे दुर्लक्ष करत आपली घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यावेळी एका प्रवाशाचे राधे माँशी भांडण झाले. त्यावेळी राधे माँ त्या प्रवाशावर ‘तुझे तोंड बंद कर’ म्हणून ओरडली आणि तिथून निघून गेली. राधे माँ दुबईला जात होती, पण ती तिच्या विमानात बसू शकली की नाही हे स्पष्ट झाले नाही.

दरम्यान, मंगळवारी बिपरजॉय चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळामधून तीव्र चक्रीवादळामध्ये रुपांतर झाले. अंदाज आहे की, 15 जूनच्या संध्याकाळच्या सुमारास हे वादळ गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडून पुढे पाकिस्तानमधील कराची दरम्यान लगतचा पाकिस्तान किनारा ओलांडेल.