लातूरची सृष्टी जगताप (Shrishti Jagtap) प्रजासत्ताक दिनी (Republic Day) 24 तास लावणी करणार आहे. सृष्टीने आपल्या या कलेचा आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा निश्चय केला आहे. सृष्टी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे नृत्य प्रकार सादर करते. यावेळी तिने 24 तास लावणी नृत्य करून आपली कला संपूर्ण जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात टीव्ही 9 मराठीने वृत्त प्रकाशित केलं आहे. सृष्टीचा निश्चय पूर्ण झाल्यास महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
लावणी नृत्य करण्यासाठी मोठी कसरत लागते. त्यात सृष्टीने प्रजासत्ताक दिनी 24 तास लावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सृष्टीचा हा निश्चय पूर्ण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सृष्टीच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. (वाचा - Farmers March In Maharashtra: संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आज राजभवनावर धडकणार)
दरम्यान, सृष्टीने आतापर्यंत आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. विशेष म्हणजे देशात आणि देशाबाहेरदेखील सृष्टीने लावणीचे सादरीकरण केलेलं आहे. परंतु, तिला आपलं नाव आशिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवायचं आहे. सृष्टीच्या या निश्चयामुळे तिला सर्वच स्थरातून कौतुकाची थाप मिळत आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये कोल्हापूरमधील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अनुप्रिया अमितकुमार गावडे या विद्यार्थीनीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली होती. अनुप्रियाने भारतीय घटनेतील प्रस्तावना, भाग 1, 2 व 3 मधील 35 कलमे व उपकलमे 6 मिनीट 10 सेकंदात पाठ केले होते. अनुप्रियाच्या कामगिरीनंतर तिला ग्रँड मास्टर हा किताब बहाल करण्यात आला.