खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली आहे. ही सुपारी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Thane gangster Raja Thakur) याला देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut on Shrikant Shinde) यांनी याबाबत मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले आहे.
संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला जीवे मारण्याचा कट रचला जात आहे. सरकार बदलल्याबरोबर माझी सर्व सुरक्षा कमी करण्यात आली. याबात मी आगोदरच आपल्याल कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंडांना धमक्या देण्याचे प्रकार सुरु आहेत. या गुंडांशी याआमदारांचे खास करुन खासदार श्रीकांत शिंदे यांचे जवळचे संबंंध आहेत. त्यामुळे या पत्राची दखल घ्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मी एका दैनिकाचा संपादक आहे. खासदारही आहे. असे असले तरी, मी भारताचा नागरिकही आहे. त्यामुळे माझ्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे, संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा, Thane: उद्धव ठाकरे गटातील शाखाप्रमुख दोन वर्षांसाठी 3 जिल्ह्यातून तडीपार, शिंदे गटासोबतच्या संघर्षानंतर पोलिसांची कारवाई)
दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपानंतर एकनाथ शिंदे गटातून जोरदार प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत यांचे आरोप म्हणजे केवळ सनसनाटी निर्माण करणे. लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण करणे, तसेच काहीतरी करुन सरकारी सुरक्षा मिळविण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाने दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे की, संजय राऊत केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी अशी वक्तवे करत आहे.
मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे की, संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते अशी काही वक्तव्ये करत आहेत. असे असले तरी संजय राऊत यांनी केलेल्या मागणीत तथ्य असेल तर गृहमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.