उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना सीबीआय कडून मोठा दिलासा मिळाला आहे. 84.6 कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडी ने युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारांचे गुन्हे दाखल करत तपास सुरू केला होता. या प्रकरणात ईडी कडून करण्यात आलेल्या कारवाईत श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्तही करण्यात आली होती. पण आता त्यांच्या विरूद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सांगत सीबीआय ने क्लिन चीट देत क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. कोर्टानेही तो स्वीकारला आहे.
आर्थिक गैरव्यवहारांवरून श्रीधर पाटणकर यांच्यावर किरीट सौमय्या यांनी देखील आरोप केले होते. श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम कंपनीत आर्थिक गैरव्यवहारामधून 29 कोटींचा काळा पैसा गुंतवल्याचा आरोप होता. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधांवरही सौमय्यांनी प्रश्न विचारले होते. दरम्यान ईडीचा विरोध असूनही विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. नक्की वाचा: Sridhar Patankar: रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिका इडीकडून जप्त .
ईडी ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी एकत्र मिळून पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमध्ये 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याद्वारा वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप होता. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीद्वारा श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचाही आरोप होता.