एसटी बसमध्ये व्हिडिओ शूट करणे पडले महागात; महामंडळाकडून महिला कंडक्टरचे निलंबन (Watch Video)
महिला कंडक्टरचे निलंबन (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एका महिला कंडक्टरला बसमध्ये व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारात कार्यरत असलेल्या मंगल सागर गिरी (गोवर्धन) यांना शनिवारी ड्युटीवरून निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एमएसआरटीसीच्या म्हणण्यानुसार, गिरी यांनी परवानगीशिवाय बसच्या ड्रायव्हरच्या सीटवर बसून व्हिडिओ शूट केला होता आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला होता, त्यामुळे राज्य परिवहन विभागाची प्रतिमा खराब झाली होती. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, गेल्या महिन्यात या महिलेने राज्य परिवहन कार्यालयाबाहेर इतर कर्मचार्‍यांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला होता.

आता गिरी यांना पुढील 15 दिवसांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गिरी यांनी दावा केला की, एमएसआरटीसी कर्मचार्‍यांनी यापूर्वी पुकारलेल्या संपादरम्यान त्या काम करत राहिल्याने त्यांच्यावर मुद्दाम ही कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयाविरोधात मंगल गिरींनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. कोणतीही पूर्वकल्पना न देता आकसापोटी आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी एसटी महामंडळावर केला आहे. (हेही वाचा: Viral Video: ट्रेनवर चढून स्टंटबाजी करणं पडलं महागात, ओव्हरहेड वायर पकडल्यामुळे स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी; पहा व्हिडीओ)

दरम्यान, मंगल या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या यातील काही व्हिडिओजनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स आहेत. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ अनेकांनी पाहिला होता. अशाच एका व्हिडिओमूळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत त्यांना निलंबित करण्यात आला आहे.