
सांगली (Sangli) येथे एका प्रेमवीराने भलताच कारनामा केला. केवळ सहा महिन्यांच्या ओळखीतून निर्माण झालेल्या मैत्रीचे रुपांत त्याने प्रेमात करायचे ठरवले आणि लागलीच मैत्रिणीला प्रेमाची गळही घातली. ती काही त्याच्या गळाला लागली नाही. शेवटी मग त्याच्या अंगात शोले (Sholay) चित्रपटातील वीरू संचारला. त्याने थेट अपार्टमेंटची गच्ची गाठली आणि तेथून शोले स्टाईल प्रपोज (Sholay Style Propose) करण्यास सुरुवात केली. मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन 'हो म्हण नाहीतर उडीच मारतो' अशी प्रपोजवजा धमकीच दिली त्याने. त्याचा हा सर्व कारनामा काही तरुणांनी पाहिला आणि थेट पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या प्रेमवीराला ताब्यात घेतले आणि त्याचे प्राण वाचवले. पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचले नसते तर कदाचीत त्याचे बरेवाईट होऊ शकले असते, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
प्राप्त माहितीनुसार, संबंधीत तरुण हा 20 वर्षांचा आहे. त्याच्या घरची स्थिती नाजूक आहे. आई धुणीभांडी करते तर वडील मोलमजूरी. स्वत:हा तरुणही सांगली येथील एका कॅफेत कुकचे काम करतो.तो मुळचा नेर्ले येथील आहे. त्याचे कुटुंबीय सध्या जयसींगपूर येथे वास्तव्यास आहे. तर तो स्वत: इस्लामपूरातील पेठ रस्त्यावरच्या विलासराव पाटील पंपाच्या पाठीमागे पाटील इस्टेट या तीन मजली इमारतीत वास्तव्यास आहे. या इमारतीच्या गच्चीवर चढूनच त्याने तरुणीला शोले स्टाईल प्रपोज करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिसरातील तरुणांनी पोलिसांना कळवले.
संबंधीत तरुणाच्या कारणाऱ्याबाबत पोलिसाना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सांगली पोलीस दलातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असलेले दीपक ठोंबरे यांनी या तरुणास बोलण्यात गुंतवले आणि हळूच त्याला पकडून जीवदान दिले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो इमारतीच्या गच्चीवर होता. तो तरुणीशी व्हिडिओ कॉल करुन हो म्हण नाहीतर गच्चीवरुन उडी मारुन जीव देतो असे सांगत होता. दरम्यान, तरुणी तुला जे करायचे ते कर, असे म्हणाल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवले आणि एका बेसावध क्षणी त्याला घट्ट पकडले. पोलिसांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणले आणि त्याची चांगलीच कानउघडणी करत समुपदेशन केले. त्याच्या आईवडीलांना तो एकुलता एक मुलगा आहे. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून त्याचे प्राण वाचवले. पोलिसांचे प्रसंगावधान आणि मुलाचे वाचलेले प्राण पाहून आई-वडीलांच्या डोळ्यांतील अश्रूची धार कित्येक वेळ थांबतच नव्हती.