Pune: पुण्यातील धक्कादायक घटना, सूनेचा छळ केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
Representational Images (File Photo)

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धास्तावून गेले असताना पुण्यातून (Pune) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाळासाहेब शिवरकर यांच्याविरोधात वनवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब यांची सून स्नेहा शिवरकर यांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे सासरकडून तिचा छळ केला जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार, बाळासाहेब यांच्यासह त्यांचा मुलगा, पत्नी आणि मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहा शिवरकर या डॉक्टर आहेत. त्यांचे 2009 साली अभिजित शिवरकर यांच्याशी लग्न झाले होते. स्नेहा यांना डायबेटिस आहे. तसेच त्यांचे पती अभिजित यांचे विवाहबाह्य संबंध असून याचा जाब विचारत असल्याचे सासरच्या सदस्यांना राग येत असे. दरम्यान, आमचे कुटुंब प्रतिष्ठित असून बाहेर कोठेही काही बोलू नको, असे म्हणत वारंवार शिवीगाळ, मारहाण केली जाई. मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केला जाई, असे स्नेहा यांनी तक्रारीत नमूद केल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यातील इंदापूर कोविड सेंटरमधील एका डॉक्टरासह 2 परिचारिकांना मारहाण, गुन्हा दाखल

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात कलम 498 (अ) नुसार फिर्यादीचे पती अभिजित शिवरकर, सासरे बाळासाहेब शिवरकर, सासू कविता शिवरकर आणि नणंद सोनाली परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटवडे करीत आहेत.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तरीही महिला अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.