Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

सायन रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी 13 ऑगस्ट रोजी दिनेश राठोड (26 वर्ष) या प्रवाशाचा एका महिलेला धक्का लागला. हा धक्का चुकीच्या पद्धतीने लावला असल्याचा आरोप करत पती-पत्नीने राठोड याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत राठोड रेल्वे रुळावर पडला. दुर्देवाने त्याच वेळी, माटुंगा स्थानकावरून आलेल्या लोकलने दिनेश राठोडला उडवले. या अपघातात जखमी झालेल्या दिनेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत प्रवाशी दिनेश राठोड हा बेस्टमध्ये वाहक पदावर काम करत होता. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने (31 वर्ष) आणि त्याची पत्नी शीतल माने (30 वर्ष) यांना अटक केली.

दोन्ही आरोपी कोल्हापूरमधील रहिवासी असून त्यांना मंगळवारी दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांना सदोष मनुष्यवध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (हे देखील वाचा: Court On Rape Of Live-In Partner's Daughter: POCSO न्यायालयाकडून लिव्ह-इन पार्टनरच्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)

नेमकं काय झालं?

पोलिसांच्या तपासानुसार, दिनेश राठोड हा जिन्यावरून फलाट क्रमांक 1 वर आला. त्यावेळी शीतल माने या महिलेला त्याचा धक्का लागला. त्यानंतर महिलेने त्याला छत्रीने मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये होत असलेली बाचाबाची बघता थोड्या अंतरावर उभा असलेला महिलेचा पती अविनाश माने देखील आला आणि त्याने दिनेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यात दिनेश रेल्वे रुळावर पडला. रुळावर पडल्यानंतर दिनेश स्वतःला सावरत असतानाच दुर्दैवाने माटूंग्यावरून आलेल्या लोकलने त्याला उडवलं. यानंतर गंभीर जखमी झलेल्या दिनेशला रुग्नालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.