प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्या विविध मार्गांनी लोकांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) होत आहे. सुशिक्षित लोकही याला बळी पडत आहेत. नुकतेच मुंबईमधील (Mumbai) एका 56 वर्षीय आहार सल्लागाराने केवायसी (KYC) फसवणुकीत लाखो रुपये गमावले आहेत. आरोपीने पीडितेला तिच्या फोनवर रिमोट ऍक्सेस कंट्रोल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले व त्याद्वारे तिची फसवणूक केली. पीडितेच्या फोनवर आरोपीचा कंट्रोल असल्याने पीडितेला तिचा फोन बंद करता आला नाही. आपल्या खात्यातून आणखी पैसे काढले जाऊ नयेत, यासाठी पीडितेने हतबल होऊन तिचा फोन तोडला. पण तोपर्यंत आरोपीने पीडितेच्या खात्यातून 5 लाख रुपये काढून घेतले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मीरा रोड येथील रहिवासी आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. कॉलरने स्वतःची ओळख राहुल अग्रवाल म्हणून करून दिली होती. त्याने टेलिकॉम कंपनीकडून कॉल करत असल्याचा दावा केला आणि पीडितेचे केवायसी तपशील अपडेट करण्याचे कारण सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडितेला तिच्या फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले आणि तिच्या बँक खात्याचे तपशील देखील शेअर केले.

पीडिता आरोपीशी बोलण्यात व्यस्त असतानाच तिला तिच्या बँक खात्यातून एक लाख रुपये डेबिट झाल्याचा मजकूर संदेश आला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडितेने तिचा फोन बंद करण्याचा प्रयत्न केला, पण फसवणूक करणार्‍याने तिच्या फोनवर रिमोट कंट्रोल ऍक्सेस घेतल्याने फोन बंद झाला नाही. त्यानंतर मात्र पीडितेने तिचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून तिचा फोन तोडला. (हेही वाचा: Fraud: 15 कोटी रुपयांच्या GST फसवणुक प्रकरणी बोरिवलीत कंपनीच्या संचालकाला अटक, बनावट कागदपत्र वापरुन बुडवला महसूल)

त्यानंतर तिने तिच्या बँकेशी संपर्क साधला आणि या दरम्यान फसवणूक करणार्‍याने 5 लाख रुपये काढून घेतले असल्याचे तीला समजले. त्यानंतर पीडितेने पोलिसांशी संपर्क साधला आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि कलम 66D माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तक्रार दाखल केली.