Shocking! काळी जादू केल्याच्या संशयावरून मुलांनी केली आपल्या आईची हत्या; पोलिसांकडून अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबईच्या (Mumbai) वडाळा (Wadala) पोलिसांनी 25 वर्षीय बेस्ट बस चालक आणि त्याच्या अल्पवयीन भावाला आपल्या 42 वर्षीय आईची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. आपली आई आई काळी जादू (Black Magic) करत असून त्यामुळे आपल्या लग्नात अडथळा निर्माण होत असल्याच्या विश्वास मोठ्या भावाला होता. यामुळे त्याने आपला लहान भाऊ व आपली गर्लफ्रेंड यांच्या मदतीने आईची हत्या केली. याप्रकरणी बस चालकाच्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे निर्मला विजय ठाकूर यांच्या हत्येचा पर्दाफाश करत पोलिसांनी त्यांचा मुलगा अक्षय ठाकूर, त्याचा लहान भाऊ आणि मैत्रीण कोमल भोईलकर (22) यांना पनवेलजवळ अटक केली.

अक्षय आणि कोमलला न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर त्याच्या अल्पवयीन भावाला न्यायालयात हजर करून डोंगरी येथील पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी सिक्युरिटी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणारे विजय ठाकूर हे सकाळी वडाळ्यातील पंचशील नगर येथील घरी परतले असता त्यांना त्यांची पत्नी चादरीने झाकलेली दिसली. बराच वेळ काहीच हालचाल न झाल्याने त्यांनी पत्नीची चादर काढली असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

त्यानंतर त्यांनी तत्काळ वडाळा पोलिसांना याबाबत माहिती दिली. वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले की, ठाकूर दाम्पत्याची मुले शहरात नसल्याने सुरुवातीला हे चोरट्याने केलेले कृत्य असल्याचे दिसून आले, परंतु आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला असता त्यामध्ये अक्षय, त्याचा भाऊ आणि कोमल पहाटे घाई घाईने बाहेर पडताना दिसले. यानंतर पोलिसांनी तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता, पोलिसांना तिघांच्याही जबाबात तफावत आढळून आली. (हेही वाचा: Pune: पुण्यात एक्स गर्लफ्रेंडशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या, एकास अटक)

त्यानंतर पोलिसांनी अक्षयची पुन्हा कसून चौकशी केली असता त्याने सर्व काही सांगून आपला गुन्हा कबूल केला. पवार यांनी सांगितले की, अक्षय आणि कोमलला लग्न करायचे होते, पण त्यांना वाटत होते की, त्यांची आई काळी जादू करते आणि त्यामुळे त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण होत आहे. 3 जून रोजी अक्षय आणि कोमलसोबत निर्मलाचा ​​वाद झाला आणि त्यानंतर अक्षयने त्याच्या आईच्या पाठीवर, चेहऱ्यावर आणि पोटावर चाकूने वार केले. कोमल आणि अक्षयच्या भावानेही या गुन्ह्यात त्याला मदत केली. अक्षय आणि कोमलने निर्मलाच्या चारित्र्याबद्दल लहान भावाचे ब्रेनवॉश केले होते, त्यामुळे तो देखील या कृत्यात सहभागी झाला.