सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर मागच्या 100 दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार? शिवसेनेचा सवाल
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून ती आत्महत्याचं असल्याचं एम्सच्या (AIIMS) अहवालातून समोर आलं आहे. यावरून शिवसेनेने आता अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? असा सवाल शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातून केला आहे. सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीचं मागायला हवी.  ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा प्रश्न देखील शिवसेनेने विचारला आहे. जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या नसून आत्महत्याच; AIIMS चा अंतिम अहवाल CBI कडे सुपूर्त)

सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. ‘ठाकरी’ भाषेतच बोलायचे तर सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता. पण शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले? सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? असा सवालदेखील शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

मुंबई पोलीस सुशांतचा तपास करू शकत नाहीत म्हणून सीबीआयला बोलवा असे किंचाळणाऱ्यांनी मागच्या 40-50 दिवसांत सीबीआय काय करतेय? हा साधा प्रश्न विचारला नाही. सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला, असंही शिवसेनेने अग्रलेखात म्हटंल आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि इतरांच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला)

हाथरस प्रकरणी कंगनाने शब्दही न काढल्याने शिवसेनेने कंगनावर टीकास्त्र डागलं आहे. सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? असा खोचक सवालदेखील शिवसेनेने केला आहे.