शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या हजारो कार्यकर्त्यांनी हाती घेतला मनसे चा झेंडा; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश
राज ठाकरे, पक्षाध्यक्ष, मनसे (Photo Credit : Facebook,MNS, Adhikrut)

महाराष्ट्रात शिवसेनेने अगदी विरोधी विचारसरणीचे असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांशी विधानसभा निवडणुकीनंतर हातमिळवणी केली. यामुळे तिन्ही पक्षातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी दुखावले गेले आहेत. आणि याचे परिणाम म्हणजे यातील अनेक दुखावलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसेतील हा प्रवेश खुद्द पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

मनसेत प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे पक्षाचं स्वरूप लवकरच बदलणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच पक्षाचा ध्वज (MNS New Flag) देखील बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

त्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे पहिले महाअधिवेशन गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर आयोजित केले आहे.या अधिवेशनादरम्यानच रा ठाकरे नव्या ध्वजाचे अनावरण करणार आहेत असं बोललं जातंय.

मनसे आपला झेंडा बदलणार? काय असणार राज ठाकरे यांची पुढील रणनीती? वाचा सविस्तर

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप या दोघांमधील युती तुटली. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांशी हातमिळवणी केली. तर दुसरीकडे भाजप एकटी पडली. निवडणुकीच्या प्रचार काळात भाजपच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे मात्र आता पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपबाबत असलेली भूमिका मवाळ करण्याची शक्यता आहे.

आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजपसोबतही जाणार की स्वबळावर पुढील निवडणुका लढवणार.