
मुंबई येथील दादर परिसरात असलेल्या शिवसेना भवन (Shivsena Bhavan ) इमारतीत वावर असलेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिवसेना भवन पुढचे तीन दिवस बंद राहणार असल्याचे समजते. शिवसेनेतील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. शिवसेना भवन हे शिवसेना (Shivsena) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. त्यामुळे या कार्यालयात शिवसेनेच्या सर्व विभागांची प्रमुख कार्यालयं आहेत. यात लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व अन्य संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे पक्ष आणि इतर कामासाठी विविध विभातील अनेक शिवसैनिक (Shivsainik) शिवसेना भवन कार्यालयात उपस्थिती लावतात. शिवसेनेच्या छोट्या-मोठ्या अनेक दैनंदिन बैठकाही इथे पार पडतात.
शिवसेना भवन कार्यालयात महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक विविध कामासाठी येत असले तरी, कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनमुळे कार्यालयात शिवसैनिकांचे येणेजाणे जवळपास थांबले होते. काही मोजकेच शिवसैनिक, पदाधिकारी कार्यालयात उपस्थिती लावत. यातल्याच एका शिवैसेनिकाला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, शिवसेना भवन आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील व्यवहार काही दिवस बंध राहणार असल्याचे समजते. तसेच, कोणत्याही कारणास्थव शिवसेना पदाधिकारी अथवा शिवसैनिक यांनी पुढचे काही दिवस या ठिकाणी उपस्थिती दर्शवू नये, अशा सूचनाही पक्षाकडून पदाधिकाऱ्यांना गेल्याचे समजते. (हेही वाचा, 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर आमदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा)
दरम्यान, आतापर्यंत विविध राजकीय नेते, मंत्री, पदाधिकारी तसेच सरकारी सेवेतील अधिकारी कर्मचारी यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. मात्र, आता कोरोना संसर्गाची झळ राजकीय पक्षाच्या कार्यालयापर्यंतही पोहोचली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्याची गर्दी असते. त्यामुळे या गर्दीचा विचार करता राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यालयांमध्ये अधिकाधिक काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.