Pune Metro (PC - Wikipedia)

पुणे (Pune) शहरात विविध मार्गावारे मेट्रो सुरु झाल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्रास होत असताना, पिंपरी चिंचवडवरून पुणे शहरात प्रवास करणारे पुणेकर केवळ 35 रुपयांच्या दरात अवघ्या 35 मिनिटांत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचत आहेत. पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते स्वारगेट मार्गावरील, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाल्यानंतर, या मार्गावरील प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे.

माहितीनुसार, 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान, पीसीएमसी ते स्वारगेट मार्गावर 3.45 लाख प्रवाशांनी प्रवास केला. आता पुणेकरांना प्रतीक्षा आहे ती हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो (Shivajinagar-Hinjewadi Metro) मार्गाची. कार्यालयीन वेळेत हिंजवडी आयटी पार्कमध्ये लोक ये-जा करत असल्यामुळे शहरातील रहदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो मार्ग सुरु झाल्यास, पुणेकरांसाठी मोठा दिलासा मिळेल. (हेही वाचा: Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे महाराष्ट्रात 3 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळापत्रक)

सध्या शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गाचे किमान 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी, शिवाजीनगर-औंध विभागातील सार्वजनिक व शासकीय सुटीच्या दिवशी गर्डर टाकणे व इतर बांधकामांना परवानगी देऊन कामाला गती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.

पुढील वर्षी सुरु होऊ शकते पुण्यातील हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो-

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी माणगाव ते हिंजवडी मार्गे शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करत आहे. याचे 99 टक्के भूसंपादन पूर्ण आणि 70 टक्के काम पूर्ण झाल्याने, हा बहुप्रतीक्षित मार्ग एप्रिल 2025 पर्यंत खुला होईल असे दिसते. या मार्गाची एकूण लांबी 23.203 किमी असून, त्यावर 23 स्थानके असतील.