Shiv Sena VS BJP: हर घर तिरंगा अभियानारुन शिवसेना-भाजपत ट्वीटर युध्द, उध्दव ठाकरेंच्या प्रश्नांना भाजपकडून सडेतोड उत्तर
Uddhav Thackeray, Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

यावर्षीचा स्वातंत्र्यदिवस (Independence Day) भारतासाठी (India) खास आहे. कारण 15 ऑगस्ट 2022 ला भारत स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून हे संपूर्ण वर्ष आपण स्वातंत्र्याचा मृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) म्हणून साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. कालपासून म्हणजे 13 ऑगस्टपासून या अभियानास सुरुवात झाली आहे. 'हर घर तिरंगा' या अभियाना अंतर्गत नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पण शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून या अभियानावर बोचरी टीका करण्यात आली आहे.

 

शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन (Tweeter Account) मायबाप सरकारने कार्यक्रम दिला आहे, हर घर तिरंगा (Har Ghar tiranga), घर घर तिरंगा. घराचा नाही पत्ता... ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी विचारला आहे. उध्दव ठाकरेंच्या या टीकेला भाजपकडून (BJP) सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. 4 व्यक्तींना राहण्यासाठी 2 बंगल्यांची गरज लागते का? त्यातील एखादी खोली देण्याची तयारी दाखवणार का? असा सवाल विचारत भाजपने उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच 600 कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणारे असे प्रश्न करू नये. मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, अभ्यास केला असता तर 9 लाख घरे महाराष्ट्रात (Maharashtra) दिली आहेत केंद्राने हे देखील समजलं असत, असा घणाघात भाजपने शिवसेनेवर केला आहे.(हे ही वाचा:- Vinayak Mete Passes Away: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन)

 

तसेच शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरुन देखील भाजपने उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडल आहे. शेतकऱ्यांना, 25 हजार देतो, 50 हजार देतो, असे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना गंडवणारे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचं नाव इतिहासात कोरलं गेलं आहे. शेतकरी संकटात असताना, घरात बसून शेतकऱ्यांना ऑनलाईन मशागत कशी करता येईल असं वायफळ संशोधन करणाऱ्यानी शेतीबद्दल बोलू नये, असा टोला भाजपने ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगवला आहे.