Priyanka Chaturvedi On BJP: सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडी भाजपचे भागीदार, शिवसेना (UBT) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्ला
Priyanka Chaturvedi | (Photo Credits: ANI/X)

शिवसेना (UBT) गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. या टीकेमध्ये त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरही निशाणा साधला आहे. अलिकडील काळात "सीबीआय (CBI), इन्कम टॅक्स (Income Tax) आणि ईडी (ED) हे भाजपचे (BJP) भागिदार झाले आहेत... ते भाजपचे एजंट कसे झाले आहेत ते संपूर्ण देश पाहत आहे", असा घणाघातही त्यांनी केला आहे. याच वेळी त्यांनी सन 2024 मध्ये जनताच त्यांना आपली जागा दाखवेल, अशी भावनाही व्यक्त केली आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा केंद्रात सत्तांतर होईल तेव्हा आम्ही पुन्हा एकदा बदल घडवू. केंद्रीय तपास यंत्रणांना संस्थांचे स्वरुप प्राप्त करुन देऊ. जेणेकरुन त्या कोणत्याही भीतीशिवाय, पक्षपात न करता, तटस्तपणे काम करु शकतील.

प्रियंका चतुर्वेदी या सातत्याने भारतीय जनता पक्षावर आक्रमकपणे हल्ला करत असतात. केंद्रीय तपास यंत्रणांनी आप खासदार संजय सिंह यांना केली अटक, राघव चढ्ढा यांना घर खाली करावयास लावण्याची सरकारची कृती यावरुनही त्यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला होता. आपचे राज्यसभेचे निलंबित खासदार राघव चड्ढा यांना बंगला रिकामा करण्याचे नुकतेच निर्देश देण्यात आले. या वेळी चतुर्वेदी यांनी जोरदार टीका करत म्हटले की, एखाद्या विशिष्ट विरोधी नेत्याला निशाणा साधणे हे सत्ताधारी पक्षाची "सूडखोर वृत्ती" दर्शवते. या आधीही अनेक खासदारांना घरांचे वाटप झाले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी पदं सोडल्यावर किंवा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही अनेक दिवस ही मंडळी त्याच घरांमध्ये राहतात. पण, हे सरकार काही व्यक्तींप्रति अत्यंत सूडाच्या भावनेने काम करते, अशी प्रतिक्रिया त्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिली.

ट्विट

पाठिमागील काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश कारवाया या विरोधी पक्षांवर केल्या जात असल्याचे वारंवार पुढे येत आहे. महाराष्ट्रामध्येही विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि तत्सम यंत्रणांद्वारे छापेमारी केली जात आहे. केवळ विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीच केंद्र सरकार या यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून त्यामुळेच केला जातो आहे, असे राजकीय नेते सांगतात. भाजप आणि एनडीए विरोधातील प्रत्येक पक्ष आज केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे चित्र देशभरात दिसत आहे. प्रियंका चतुर्वेदी खासदार असलेल्या शिवसेना (UBT) पक्षातील नेते संजय राऊत यांनाही अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.