शरद पवार यांच्या सभांमुळे शिवसेना पक्षासमोर चिंता? राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चुकवणार सेनेच्या बाणाचा नेम?
NCP-Shiv Sena | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी लावलेला प्रचाराचा धडाका पाहून अनेकांना आश्चर्य वाटले तर काहींना धडकी भरली. खास करुन शरद पवार यांच्या सभा आणि त्यांना मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहून शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण असल्याचे समजते. विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष महायुती तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महाआघाडी असा सामना रंगला. यात भाजप 164, शिवसेना 124, काँग्रेस काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागांवर मित्रपक्ष लढत आहेत. यात महत्त्वाचे असे की, शिवसेना लढवत असलेल्या 124 जागांपैकी ५७ जागांवर शिवसेना राष्ट्रवादी असा सामना रंगत आहे. नेमकी हीच बाब शिवसेनेच्या चिंतेचे कारण ठरल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप-शिवसेना पक्षांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळाली. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काहीसे कमी पडले. विरोधकांमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेली काँग्रेस तर महाराष्ट्र विधानसभा प्रचारात फारशी पाहायलाच मिळाली नाही. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही फारसे आले नाहीत. तर, मराहाष्ट्रातील काँग्रेस नेते हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच अडकून पडले. असे असले तरी, शरद पवार यांच्या रुपाने मात्र विरोधकांची प्रचाराची व्याप्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरुन काढली.

शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचाराचा आणि सभांचा धडाका लावला. वयाची सत्तरीपार असलेला हा नेत जेव्हा तीशीतल्या तरुणाच्या उत्साहाने मैदानात उतरलेला जनतेने पाहिला तेव्हा आश्चर्य, उत्सुकता आणि आदर या सर्व भावनांचे मिश्रण पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या सभांना ग्रामिण महाराष्ट्रात प्रतिसादही जोरदार पाहायला मिळाला. त्यामुळे या प्रतिसादाचे विजयात परिवर्तन झाले तर सत्ताधरी पक्षांमध्ये सर्वाधिक फटका हा शिसेनेच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिवसेना उमेदवारांच्या एकूण यादीवर नजर टाकता 57 मतदारसंघात शिवसेना उमेदवारांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस तर, 15 मतदारसंघात मनसेच्या उमेदवरांसोबत आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबर हा विधानसभा निवडणूक मतमोजणीचा दिवस शिवसेनेसाठी कसा ठरतो याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, जोशी असलो तरी ज्योतीषी नाही, महायुती 200 जागा पार करणे कठीण: मनोहर जोशी)

दरम्यान, एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.