मंत्रीपद तोंडावर असताना जनतेने दिला डच्चू; दिग्गजांच्या पराभवानंतर शिवसेना शोधणार नवे चेहरे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हन
Anandrao Adsul, Shivajirao Adhalarao Patil, Anant Geete, Chandrakant Khaire | (Photo credit: archived, modified, representative image)

NDA Government 2: लोकसभा निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाला असला तरी, या पराभवाची सर्वाधिक सल ही शिवसेनेच्या दिग्गजांना जाणवत आहे. केंद्रात NDA बहुमताने सरकार स्थापन करत असतान हातातोंडाशी आलेले मंत्रीपद पराभवामुळे दूर गेले आहे. शिवसेना नेते अनंत गिते (Anant Geete), शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ), आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)अशी या दिग्गजांची नावे आहेत. या चौघांचीही या वेळी तीसरी किंवा चौथी टर्म होती. मात्र, त्यांना जनतेने मतदानाच्या माध्यमातून असा काही दणका दिला की मंत्रिपदाच्या रिंगणात असूनही ते नापास झाले. त्यामुळे आता मंत्रिपदाचा विचारच करायचा तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान आहे. कारण त्यांनाही आता मंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्यांचाच शोध घ्यावा लागणार आहे.

अनंत गिते, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि चंद्रकांत खैरे यांच्या रुपात पराभूत झालेले हे उमेदवार केवळ पराभूत झालेले उमेदवार नव्हते. तर हे चारही नेते या वेळी मंत्रीपदाच्या शर्यतीत आणि चर्चेतही होते.

रायगड लोकसभा मतदारसंघ

अनंत गिते हे तर शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री होते. मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल तटकरे यांनी त्यांचा धक्कादायकरित्या पराभव केला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन तब्बल 3 वेळा निवडूण आले होते. आता त्यांची चौथी टर्म होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांच्याकडून त्यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे खैरे हे मंत्रिपदाच्या स्पर्धेतून बाजूला फेकेले गेले. (हेही वाचा,अनिल देसाई, अरविंद सावंत, भावना गवळी, विनायक राऊत हे आहे शिवसेना पक्षाचे केंद्रातील मंत्रीपदासाठी स्पर्धेतील चेहरे )

शिरुर लोकसभा मतदारसंघ

शिरुर हा सुद्धा तसा शिवसेनेचाच बालेकिल्ला. या मतदारसंघातून गेली अनेक वर्षे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येत. या मतदारसंघातून आढळराव हे तब्बल तीन वेळा खासदार राहिले. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा दणदणीत पराभव केला.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

अमरावती हा देखील शिवसेनेचा बालेकिल्लाच म्हणून ओळखला जायचा. या मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव आडसूळ हे सातत्याने गेली अनेक वर्षे निवडूण येत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या वेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा जोरदार पराभव केला.

वरील चारही नेते शिवसेनेचे जुने, जाणते आणि ज्येष्ठ नेते आहे. संसदीय कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. तसेच, अनेक वर्षे संसदेत काम केल्यामुळे या नेत्यांना स्थानिक आणि राष्ट्रीय प्रश्नांची चांगली जाण आली आहे. त्यातच शिवसेना हा भाजपचा अत्यंत जुना मित्र असल्याने NDA सत्तास्थापनेत शिवसेनेला मंत्रिपदं मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे कोणताही पक्ष अपवाद वगळता कोणत्याही खासदाराला मंत्रिपद देताना त्याचा अनुभव, वय, अभ्यास आणि पक्षकार्य ध्यानात घेतो. या सर्व गोष्टींचा विचार करता वरील चारही नेते या सूत्रात चपकल बसत होते. मात्र, ऐनवेळी जनतेने दणका दिल्याने या मंडळींची मंत्रिपद मिळण्याची मनोकामना सध्यातरी पूर्ण होणार नाही. हे नक्की.