गोपीनाथ गडावर उद्धव ठाकरे यांच्या पायाला दुखापत; पायाला बँडेज बांधून पुढच्या दौऱ्यासाठी रवाना
Uddhav Thackeray at Gopinath Gad | (Photo Credits: Twitter/Shiv Sena)

Uddhav Thackeray at Gopinath Gad: शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) सत्तासंघर्ष कायम असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मराठवाडा दैऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते मराठवडा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या दौऱ्यात आज त्यांनी बीड जिल्ह्यात जाऊन परळी येथील गोपीनाथ गडाला(Gopinath Gad) भेट दिली. या भेटीत त्यांच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर नसल्याने पायाला बँडेज बांधून ठाकरे हे पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

उद्धव ठाकरे यांचे गोपीनाथ गडावर मोठ्या उत्साहात स्वागत झाले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकासोबत भाजप कार्कर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी गोपीनाथ गडावर धनुष्यबाण आणि कमळाच्या आकाराची रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या रांगोळीत 'आठवण साहेबांची' असे भावनिक शब्दही लिहिण्यात आले होते.

शिवसेना ट्विट

गोपीनाथ गडावर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत नेमकी कोणत्या प्रकारची आहे. तसेच, कोणत्या कारणामुळे झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. या वेळी शिवसेना नेते एकनाथ खडसे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मीलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर यांच्यासह शिवसेना आमदार आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. (हेही वाचा, 'पक्षांतर करुन पुन्हा निवडून येऊन दाखवाच', राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपसह फुटीरांना आव्हान)

शिवसेना ट्विट

दरम्यान, औरंगाबाद येथे बोलताना पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. मात्र, शिवसेना भाजप सत्तासंघर्षावर प्रसारमाध्यमांनी विचारले असता कोणतीही प्रतिक्रिया देणे उद्धव ठाकरे यांनी टाळले. उद्धव ठाकरे यांच्या मौनामुळे शिवसेना-भाजपतील सत्तासंघर्ष आता कोणत्या टोकाला जातो याबबत उत्सुकता आहे.