शेतकरी प्रश्नावर शिवसेना आक्रमक; पिक विमा कंपन्यावर काढणार मोर्चा; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा
Uddhav Thackeray and Aditya Thackeray | ( Photo Credits: Twitter/Shiv Sena)

सत्तेत सहभागी असलेली शिवसेना (Shiv Sena) शेतकरी आणि पिक विमा (Crop Insurance) प्रश्नावरुन चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्याचे प्रश्न अद्याप मार्गी लागत नाहीत. नाही म्हणायला त्याला नुकसान भरपाई काही प्रमाणात मिळत आहे. मात्र, अद्यापही त्याला पिक विमा कंपन्यांकडून पिक विम्याचे पैसे अद्यापही मिळले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पिक विमा कंपनी (Crop Insurance Companies) कार्यालयांवर मोर्चा काढणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, शिवसेना येत्या 17 तारखेला मुंबई येथील बीकेसी परिसरात असलेल्या विमा कंपनी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजवर शेतकरी मुंबईत येऊन मोर्चे काढत होता. परंतु, आता शिवसेनाच मुंबईत मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा शेतकऱ्यंचा नसेल. तर, शेतकऱ्यांसाठी असेल, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.  पिक विमा देणाऱ्या एकाच कंपनीचे कार्यालय बिकेसी येथे आहे. परंतु, हा मोर्चा सर्वच पिक विमा कंपन्यांना इशारा आहे. मग, त्या मुंबई, पुणे किंवा इतर कुठल्या का असेनात, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

सुरवातीला आम्ही साध्या भाषेत पिक विमा कंपन्यांना समजावत आहोत. परंतु, तरीही या कंपन्यांनी ऐकले नाही. तर, मग शिवसेना आहे, सरकार आहे आणि पिक विमा कंपन्या आहेत. मग आम्ही बघुन घेऊ काय करायचे, अशा थेट शब्दात उद्धव ठाकरे यांनी पिक विमा कंपन्यांना इशाराही या वेळी दिला. (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा शिवबंधनात; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश)

दरम्यान, पिक विमा कार्यालयांवरील मोर्चाच्या निमित्ताने शिवसेनेने प्रदीर्घ काळानंतर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे हा मोर्चा आणि त्याचा परिणाम याबाबत बरीच उत्सुकता आहे.