Representational Image (Photo Credits: Pixabay)

Shivsena Leader Suicide: नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. उमेश नाईक (Umesh Naik) असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. नाईक यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उमेश नाईक आर्थिक विवंचनेत होते. कदाचित त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शिवसेना पदाधिकारी उमेश नाईक हे नाशिक शहरातील काळाराम परिसरात राहत होते. परंतु, त्याचं जुनं घर नागचौक परिसरात आहे. नाईक यांना या घराचं रंगकाम करायचं होतं. या घराचं रंगकाम करायचं आहे, असं कुटुंबियांना सांगून नाईक जुन्या घरी गेले. परंतु, बराचं वेळ झाला तरी ते आपल्या नव्या घरी परतले नाहीत. म्हणून त्यांच्या पत्नीने आणि कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. (वाचा - नजिकची स्मशानभूमी शोधण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून ऑनलाइन पोर्टल सुरू)

त्यानंतर कुटुंबियांनी नाईक यांचा शोध घेण्यासाठी काळाराम परिसरातील जुने घर गाठले. येथे आल्यानंतर कुटुंबियांना घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसला. त्यानंतर कुटुंबियांनी घराचा दरवाजा तोडला. यावेळी नाईक स्लॅबच्या गजाला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या धक्कादायक घटनेमुळे काळाराम परिसरात खळबळ उडाली असून नाईक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.